अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आधुनिक काळाच्या गरजेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती व तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक इमारत व सुसज्ज मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. भविष्याचा अचूक वेध घेवून दूरदृष्टी ठेवून कार्यरत असणार्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी ही गरज ओळखून त्यादृष्टीने माहिती व तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती भवन उभारण्यासाठी अलिबागमधील पिंपळभाट येथील प्रस्तावित जागेची पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, डॉ.जगन्नाथ वीरकर, कार्यकारी अभियंता राहुल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार सचिन शेजाळ, कनिष्ठ अभियंता श्री.राहुल बागूल, कनिष्ठ अभियंता कु.धनश्री भोसले आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री तटकरे यांनी नियोजित जिल्हा माहिती भवन विषयी बोलताना सांगितले की, जिल्हा माहिती कार्यालयाचे कार्य अधिक गतिमान होण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन प्रसिध्दीविषयी कामकाज अधिक उत्तमरित्या होण्यासाठी त्याचबरोबर प्रसारमाध्यम प्रतिनिधींना जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून माहिती प्रसारणाच्या कामाच्या दृष्टीने अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळण्यासाठी हे अद्ययावत जिल्हा माहिती भवन निश्चित उपयुक्त ठरेल. या माहिती भवनात जिल्हा माहिती कार्यालय, मिनी थिएटर, मिनी स्टुडियो, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, मीडिया सनियंत्रण कक्ष, प्रदर्शन दालन, विविधोपयोगी सभागृह, डिजिटल वाचनालय, प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता अद्ययावत प्रसारमाध्यम कक्ष,आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र अशा विविध बाबी प्रस्तावित आहेत. रायगड जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण ठरेल असे जिल्हा माहिती भवन उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही लवकरच सुरु करण्यात येईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.