नुकसान भरपाईचा प्रस्ताव लालफितीत; अवेळी पावसात भातपिकासह सहा हजार 738 हेक्टर क्षेत्राचे नुकसान
। अलिबाग । प्रमोद जाधव । रायगड जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरमध्ये अवेळी पाऊस पडला. या पावसात जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 6 हजार 738 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये 6 हजार 730 हेक्टर भातपीक व 8.37 हेक्टर नागली (नाचणी) पिकाचे नुकसान झाले. या अवेळी पावसात 9 कोटी 36 लाख रुपयांची हानी झाली आहे. परिणामी, 22 हजार 284 शेतकर्यांना भरपाईची प्रतिक्षा लागून राहिली आहे. भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु तो प्रस्ताव अजूनही लालफितीत अडकून असल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस समाधानकारक पडला. परंतु जूलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले. या संकटातून शेतकरी सावर्याचा प्रयत्न करीत असताना जिल्ह्यात अवेळी पावसामुळेदेखील शेतकर्यांची मोठी हानी झाली. रायगड जिल्ह्यात 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत अवेळी पावसामुळे पेण, मूरूड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, माणगांव, तळा, रोहा, सुधागड पाली, महाड पोलादपूर, म्हसळा व श्रीवर्धन या 13 तालुक्यातील 1 हजार 273 गावांमधील 22 हजार 286 शेतकर्यांच्या भात व नागली पिकांमधील 6 हजार 738 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या स्वाक्षरीने तो अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापही शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे समोर आले आहे. शासनाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकर्यांना भरपाईची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जूलै महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाईदेखील अद्याप मिळाली नसल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे.
माणगांवमध्ये सर्वाधिक गावे रायगड जिल्ह्यातील 13 तालुक्यातील शेतकर्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनूसार, माणगाव तालुक्यात सर्वाधिक 206 बाधित गावे असल्याचे माहिती समोर आली आहे. यावरुन अवेळी पावसाचा फटका सर्वाधिक माणगांवकरांना बसला असल्याचेही यावरुन स्पष्ट होते.