जमिनीच्या वादातून घडला प्रकार
। महाड । प्रतिनिधी ।
जमिनीच्या वादातून एका व्यापार्यावर कुर्हाडीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्याची घटना सोमवारी सायंकाळी महाडमध्ये घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्लेखोराच्या बहिणीने देखील या व्यापार्याविरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
सुहास तलाठी असे जखमी व्यापार्याचे नाव आहे. महाड शहरानजीक असलेल्या चांभारखिंड गावाच्या हद्दीतील जमीन या कुटुंबाच्या मालकीची आहे. न्यायालयाने तसा निर्णय दिला आहे. त्यामुळे या जागेच्या महामार्गासाठी संपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला तलाठी कुटुंबाला मिळाला आहे. या जमिनीवर विजय ऐनकर याने आपला हक्क सांगितला आहे. त्यातून वाद होऊन विजय ऐनकर याने सुहास तलाठी यांच्यावर कुर्हाडीने हल्ला केला. कुर्हाडीचा हा वार हातावर झेलल्याने सुहास तलाठी यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सुहास तलाठी यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारा त्यांचा भाऊ जितेंद्र हादेखील जखमी झाला आहे.
याप्रकरणी जितेंद्र तलाठी यानी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय ऐनकर, एक अज्ञात महिला आणि एका अज्ञात तरुणाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विजय ऐनकर याच्या बहिणीनेदेखील सुहास तलाठी याने आपला विनयभंग आणि आपल्याला आणि आपल्या भावाला मारहाण केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार सुहास तलाठी आणि दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम.पी. लोणे हे करीत आहेत.