। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यात दोन सख्ख्या भावांमध्ये वडिलोपार्जित जागेवरून वाद उफाळून दोघांमध्ये या गोष्टीवरून जोरदार हाणामारी होऊन एकाचे डोके फुटल्याने तो जखमी झाला.सदरील घटना रविवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील ताम्हाणे धाडवेवाडी येथे फिर्यादी शांताराम दगडू धाडवे (वय-48) यांच्या राहते घरासमोर घडली.याबाबत आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शांताराम दगडू धाडवे व आरोपी श्रीराम दगडू धाडवे(वय- 56) रा.ताम्हाणे धाडवेवाडी ता.माणगाव हे नात्याने सख्खे भाऊ असून त्यांच्यामध्ये वडिलोपार्जित जागेवरून वाद असून या कारणास्तव त्यांच्यात सतत भांडणे होत असतात.फिर्यादी शांताराम दगडू धाडवे याने आईवर चोरीचा आरोप केला या कारणावरून वाद होऊन आरोपी श्रीराम दगडू धाडवे याने त्याच्या हातात असलेल्या काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापती करून शिवीगाळी करून त्यास जखमी केले. सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर हे करीत आहेत.