बा रायगड परिवाराचे श्रमदान व गडसंवर्धन मोहीम फत्ते
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
बा रायगड परिवारातर्फे किल्ले सुधागडावर दोन दिवशीय श्रमदान व गडसंवर्धन मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत महादरवाजाला वॉर्निश लावून साफसफाई करण्यात आली. तसेच बुरुज व दरवाजांची साफसफाई आणि पाण्याची टाके स्वच्छ करून इतरही संवर्धनाची कामे करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मोहीम राबविण्यात आली .
या मोहिमेत सहभागी संख्या जास्त असल्यामुळे आणि वेगवेगळ्या शहरातून सर्वजण आल्यामुळे कोरोना ची स्थिती लक्षात घेता वेगळ्या वेगळ्या टीम बनवून काम करण्यात आले. यावेळी गोमुखी कातळशिल्पात जडवलेल्या महादारवाज्याला वूड पॉलिश लावण्यात आले. चिलखती बुरुजाच्या वर असलेलं टाकं आणि वाड्यातून चोरदिंडीत जाताना वाटेत असलेल्या पाण्याच्या टाक्यामधील पाणी काढुन त्यातला गाळ व कचरा काढून साफ करण्यात आला. तसेच चोर दिंडी कडील बुरुज व महादरवाजा जवळील तटबंदीवर वाढलेली झाडेझुडपे तोडून साफसफाई करण्यात आली. हे काम अतिशय जोखमीचे होते. या बरोबरच महारवाज्याच्या वर बाजूस पडणार्या पाण्याचा मार्ग बदलण्यात आला तिथे चर काढण्यात आले. अशा प्रकारे ही श्रमदान व संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबिवण्यात आली. या मोहिमेत शेखर तांबट, मनोज थिटे व साई व्हावळ यांच्यासह बा रायगड परिवारातील सदस्य सहभागी झाले होते.