राबगाव येथील शासकीय जागा हस्तांतरित; पालकमंत्री आदिती तटकरे यांचा पुढाकार
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कोव्हिड 19 च्या संकटात आरोग्य सेवासुविधा सक्षम व परिपुर्ण असणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुधागड-पाली तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र राबगाव या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी उपकेंद्राच्या जागा हस्तांतरित करून कामाला गती दिली जात आहे. उपकेंद्र निर्माणाने राबगाव सह परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर मौजे राबगाव येथील स.नं./हि.नं.91 क्षेत्र 2-10-0 हे.आर. पैकी 0-05-0 हे.आर.ही जमीन ग्रामपंचायत राबगाव ता.सुधागड-पाली यांच्याकडून शासनाकडे पुर्नग्रहण करुन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने कब्जा हक्काने ही शासकीय जमीन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र राबगाव करिता पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. सुधागड-पाली तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.