हवामान विभागाचा अंदाज
मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणाकडे पाठ फिरवलेला पाऊस 13 ऑगस्टपासून पुन्हा सक्रिय होणार असून त्यानंतर 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. ऑगस्टच्या प्रारंभापासूनच मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली. कडक ऊन आणि अधूनमधून येणारी एखादी हलकी सर अशा वातावरणामुळे तापमानही वाढले आहे. मुंबई उपनगरात बुधवारी 26.5 अंश सेल्सिअस किमान, तर 31.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. दोन्हींमध्ये सरासरीच्या तुलनेत 2 अंशांची वाढ दिसून आली. मुंबई शहर भागात आणि रत्नागिरी येथेही कमाल तापमानात 2 अंशांची वाढ झाली.
जून व जुलै या सलग दोन महिन्यांत सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. ऑगस्टचे दहा दिवस कोरडे गेले असतानाच पाऊस पुन्हा परतण्याची आशा निर्माण झाली आहे. 13 ऑगस्टपासून पाऊस पुन्हा सुरू होणार असून 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुत्ये यांनी सांगितले.