। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील अनेक वर्ष रिक्त असलेल्या 9 अंगणवाडी सेविकांची पदे भरली जाणार आहेत. त्याबाबत शासनाच्या आदेशाने एकात्मिक महिला बालकल्याण विभाग उरणने एका नोटिसीद्वारे जाहीर केले आहे. कोव्हिड 19 काळात एक महत्वाचा सरकारी घटक म्हणून अंगणवाडी सेविका पुढे आल्या आहेत. सगळे थांबले असताना अगदी तुटपुंज्या मानधनावर आपल्या अंगणवाडीचे काम करून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून कोव्हिडबाबत माहिती गोळा करणे व शासकीय योजना पुरवणे अशी कामे त्यांनी अपुर्या सुविधा असूनही जिव धोक्यात घालून केल्या. त्यामुळे बरेच वर्ष रिक्त असलेली ही पदे भरण्याचे शासनाने नोटीस काढून जाहीर केले आहे. त्यानुसार उरणमधील एकूण 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत.त्याबाबत इच्छूक व गरजू महिलांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासोबत वा एकात्मिक महिला बालकल्याण विभाग कार्यालय उरण येथे संपर्क करून माहिती घ्यावी आसे एकात्मिक महिला बालकल्याण विभाग उरणचे अधिकारी प्रविण पाटील यांनी सांगितले आहे.