पद्मश्री डॉ.राणी बंग यांचे मत
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मासिक पाळी ही अपवित्र, विटाळ आहे हीच मोठी अंधश्रध्दा आहे. सर्व महिलांनी मासिक पाळीचा अभिमान बाळगला पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री डॉ.राणी बंग (गडचिरोली) यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित ‘गुंफू हातामध्ये हात, फुलू पुन्हा एक साथ’ विषायांतर्गत तीन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत पहिल्या सत्रात त्या ‘काय बाय सांगू, कसं ग सांगू’ या विषयावर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘लैंगिकतेबद्दल चुप्पी सोडली पाहिजे. कुटुंबात, समाजात याबाबत मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे. समलैंगिक संबंधांना समजून घेऊन अशा व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला मान्य करावा.’
‘बाईचा जन्म सहन करण्यासाठी असे मानणे, हे सर्वात मोठे सामाजिक प्रदूषण.उत्क्रांतीच्या टप्प्यावर पुरुषाचा मेंदू हा स्रीच्या मेंदू पेक्षा 11 टक्क्यांनी मोठा असला तरी सूक्ष्म विचार करणे, निर्णय घेणे, तर्क करणे, संशोधन करणे अशाबाबतीत स्त्रीचा मेंदू हा, अकरा टक्क्याने पुरुषाच्या मेंदूपेक्षा अधिक प्रगल्भ आहे, असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे स्त्रियांचा मेंदू अधिक परिपक्व असून, सूक्ष्म हालचालींचा अर्थ लावण्याची क्षमता स्त्रियांमध्ये अधिक असते. म्हणून स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत तसूभरही कमी नाही, तिनेही स्वतःला कमी लेखू नये, असा अभ्यासपूर्ण सल्ला डॉ. राणी बंग यांनी दिला.
या व्याख्यानात पाचशेहून अधिक प्रेक्षक सहभागी झाले होते. त्यात महिला श्रोत्यांचे प्रमाण अधिक होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सविता शेटे बीड, निमा शिंगारे नवी मुंबई यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन कल्पना बोंबे ठाणे यांनी केले. प्रश्नवाचन जयश्री चव्हाण नंदुरबार, रुक्साना मुल्ला यांनी आभार मानले.राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, माधव बावगे, सुशीला मुंडे, नंदकिशोर तळाशी कर, सुरखा भापकर, नितीन राऊत, अवधूत कांबळे, सुयश तोष्णीवाल, सारिका डेहनकर आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.