खेड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून तयार करण्यात येत असलेल्या कशेडी बोगद्याचे काम पूर्ण झाले असल्याचा व्हिडिओ गेले दोन दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे; मात्र बोगद्याचे काम आजही प्रगतीपथावर असून हा बोगदा २०२२ अखेर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेल्या कशेडी बोगद्याच्या व्हिडिओमुळे कशेडी बोगद्याबाबत उत्सुकता असणाऱ्या कोकणवासीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा चालकांसाठी कसोटीचा घाट मानला जातो. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हद्दीत ११ किमी, तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात ७ कि.मी. म्हणजे तब्बल १८ कि.मी.चा हा घाट असून हा घाट पार करण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागतो. नागमोडी वळणांचा हा घाट चढताना आणि उतरताना चालकांकडून जरा जरी चूक झाली तरी जीवघेणा अपघात हा ठरलेलाच.
यातून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी कशेडी ते पोलादपूर तालुक्यातील भोगाव दरम्यान बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रिलायन्स इन्फ्रा लिमिटेड, मुंबई या कंपनीने या कामाचा ठेका घेतला असून २५ जानेवारी २०१९ ला कामाचे भूमिपूजन झाले. कशेडी ते पोलादपूर तालुक्यातील भोगाव दरम्यानचा हा बोगदा तयार करण्यासाठी ७४३.३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून सद्यःस्थितीत दोन्ही बाजूने बोगद्याचे काम प्रगतिपथावर आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ‘माईल स्टोन’ ठरणार आहे. बोगद्याच्या खोदाईचेच काम सुरू कंपनी व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार बोगद्याचे काम २०२२ अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून कशेडी बोगद्यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असून या व्हिडिओत या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे. या व्हिडिओचे वायरल सत्य चेक करण्याचा प्रयत्न केला असता, अद्याप बोगद्याच्या खोदाईचेच काम सुरू आहे. त्यानंतर बोगद्यातील अंतर्गत रस्ते, प्लास्टर, विद्युतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे बोगद्याचे काम पूर्ण होऊन बोगद्यातून वाहतूक सुरू व्हायला अजून किमान वर्ष तरी जाणार आहे.