टोरंटला स्थानिकांनी विरोध करावा; बाबू घारे यांचे पत्रकार परिषदेत आवाहन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी आणि साई डोंगर येथे टोरंट ही खासगी कंपनी वीज प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कर्जत तालुक्यातून जाणार आहे. त्यासाठी तालुक्याच्या अर्ध्या भागातून टॉवर उभे राहणार आहेत. हे टॉवर उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध करावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी केले आहे. दरम्यान, फार्महाऊस आणि सेकंड होमचा तालुका समजल्या जाणाऱ्या शेत जमीन आणि अकृषिक जमिनीचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याचा दावा देखील बाबू घारे यांनी केला आहे.
टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी आणि साई डोंगर या भागात जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाच्या माती परीक्षण आणि दगड परीक्षण यांची कामे सुरू असून स्थानिकांचा या सर्व कामांना विरोध आहे. असे असताना आता टोरंट कंपनीकडून प्रकल्पात निर्माण होणारी वीज टॉवर वरून नेली जाणार आहे. यासर्व बाबतीत जलविद्युत प्रकल्प होणार असलेल्या भागाचे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य बाबू घारे यांनी प्रकल्पाला कशासाठी विरोध आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी बाबू घारे यांनी, आपल्या जिल्हा परिषद गटात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. अशावेळी प्रकल्प आल्यास प्रत्येक बाबतीत स्थानिकांना नुकसान सहन करावे लागणार आहे. ते लक्षात घेऊन आपण स्वतः आणि आपला पक्ष त्या ठिकाणी प्रकल्पाला कायम विरोध करीत राहणार आहे. हा प्रकल्प वरच्या स्तरावरून कर्जत तालुक्यावर लादला गेला आहे, असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रकल्पाबद्दल आम्ही प्रशासन तहसीलदार आणि वन विभाग यांच्याकडे कागदपत्र मागितली, तर त्यांच्याकडून वरून मंजुरी मिळाली असून वरच्या कार्यालयात ही कागदपत्रे मिळतील, अशी माहिती दिली जात आहे. धरण होणार असलेल्या पाली खोंडा भागात 200 वर्षांपूर्वीची झाडे असून त्या 5 लाख झाडांचा बळी दिला जाणार आहे. येथील आंबेवाडी, भोमाल वाडी, धनगर वाडी येथील आदिवासी लोकांच्या जमिनीवर बळजबरी अतिक्रमण केले जात आहे. येथील आदिवासी लोकांचे जीवनमान हे केवळ जंगल येथील रानमेवा आणि नदीमध्ये मासे यांच्यावर चालवली जाते. येथील आदिवासींच्या वन जमिनी व दळी भूखंड यावर सुरू असलेले अतिक्रमण हे कोणत्याही शेतकरी यांची परवानगी न घेता किंवा विश्वासात न घेता अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ते तत्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि टोरंट कंपनी यांना दिले असल्याची माहिती बाबू घारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या प्रकल्पाच्या विरोधात उभा राहिला आहे. तालुक्यातील राजकारणी हे प्रकल्पाच्या विरोधात का उतरत नाही? हा प्रकल्प कर्जत तालुक्यातून हद्दपार व्हावा यासाठी आम्ही दि.18 मे रोजी कर्जत येथे धरणे आंदोलन उभे करणार आहोत. त्या आंदोलनात कर्जत तालुक्यातील सर्व जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन बाबू घारे यांनी केले आहे.
जमिनीचे मूल्यांकन शुन्य होणार
कर्जत तालुक्यात जलविद्युत प्रकल्प मधून निर्माण होणारी वीज ही टॉवर लाइन टाकून तालुक्याचे बाहेर नेली जाणार आहे. त्यासाठी कर्जत तालुक्याच्या अर्ध्या भागातून टॉवर टाकले जाणार आहेत. हे टॉवर टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध करावा, असे आवाहन केले. या टॉवर मुळे कर्जत तालुक्याचे पर्यावरण धोक्यात येणार आहे.तसेच, तालुक्यातील फार्महाऊस आणि अकृषिक जमिनी यांची भाव कमी होणार असून जमिनीला काहीही उपयोग राहणार नाही. विजेचे टॉवर लाइन जातात त्या जमिनीचे मूल्यांकन शून्य राहते. त्यामुळे असे टॉवर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत टाकू देऊ नये आणि आपली जमिनीचे मूल्य कमी करून घेऊ नये, अशी सूचना केली.







