अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या रायगडमधील शाळांना सुट्टी


|अलिबाग | प्रतिनिधी |


रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने सोमवार, ६ जुलै रोजी अतिमुसळधार ते अत्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. स्थानिक परिस्थिती तसेच प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालांचा आढावा घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version