शववाहिकेसाठी तीन तास प्रतीक्षा; आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न
|अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग एसटी स्थानकासमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र मृतदेह सरकारी रुग्णालयात हलविण्यासाठी तब्बल तीन तास ॲम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल नाईक यांनी केला. यावेळी नगरसेविका ॲड. अश्विनी ठोसरही घटनास्थळी उपस्थित होत्या.
स्वप्निल नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते अलिबाग एसटी स्थानक परिसरात आले असता स्थानकासमोर एका अज्ञात व्यक्तीला रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत पाहिले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगावर मोठ्या प्रमाणात माशा बसल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र एसटी स्थानकापासून अवघ्या काहीशे मीटर अंतरावर असलेल्या जिल्हा सरकारी रुग्णालयात मृतदेह हलविण्यासाठी साकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत एकही ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नसल्याचा आरोप करण्यात आला.
स्वप्निल नाईक यांनी सांगितले की, सरकारी रुग्णालयाबाहेर अनेक खासगी ॲम्ब्युलन्स उभ्या असतात. मात्र घटनेच्या वेळी त्या उपलब्ध नव्हत्या. काही चालक बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृतदेह हलविण्यास मोठा विलंब झाला आणि प्रशासनाच्या आपत्कालीन सेवांतील नियोजनाचा अभाव समोर आला.
यावेळी उपस्थित असलेल्या नगरसेविका ॲड. अश्विनी ठोसर यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, अलिबाग शहरात आपत्कालीन परिस्थितीसाठी कायमस्वरूपी सरकारी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
या घटनेमुळे अलिबाग शहरातील आपत्कालीन आरोग्य सेवा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, याप्रकरणी चौकशी करून आवश्यक सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






