बालपणीच्या मित्रांनी जागवल्या आठवणी; मुरूडशी नानांचे नाते अखेरपर्यंत राहिले घट्ट
| मुरुड-जंजिरा | सुधीर नाझरे |
ज्या मुरूडच्या मातीत नानांनी बालपणीचे दिवस अनुभवले, समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत हुंदडले, त्याच मुरूडमध्ये आज त्यांच्या आठवणींनी वातावरण भावूक झाले आहे. पडद्यावरचा मोठा अभिनेता म्हणून जगभर नाव कमावलेल्या नाना पाटेकर यांच्या निधनाने मुरूडने केवळ एक कलाकार गमावला नाही, तर आपल्या मातीतला, आपल्या माणसांमध्ये रमणारा जिवलग हरपला आहे. नानांच्या बालपणीच्या मित्रांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक प्रसंग सांगितले आणि जुन्या आठवणींच्या गर्दीत त्यांचे डोळेही पाणावले.
नाना पाटेकर यांचे बालपण मुरूडमध्ये गेले. नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांचे नातेवाईक आणि अनेक जुने मित्र आजही मुरूडमध्ये आहेत. रायगडमध्ये आल्यानंतर मुरूडच्या पाटील खानावळीत जेवण्याचा त्यांचा आग्रह असायचा. नानांचे मामेभाऊ श्रीकांत सुर्वे यांनीही त्यांच्या आठवणी सांगताना नानांच्या कुटुंबवत्सल स्वभावाला उजाळा दिला. नाना आवर्जून कुटुंबातील प्रत्येकाची आस्थेने चौकशी करायचे. कुटुंबाची काळजी घेणारा माणूस आमच्यातून गेला, हे आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुरूडमधील बाळा साखरकर यांचा नातू नानांचा वर्गमित्र होता. मुरूडला आल्यानंतर नाना मित्रांसोबत समुद्रात फेरफटका मारण्यासाठी साखरकर यांच्या होडीतून जात असत. 2006 मधील असाच एक प्रसंग सुधीर नाझरे यांनी सांगितला.
नाना आणि त्यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांच्यासोबत मंगेश कुलकर्णी, किरण बाथम आणि आम्ही शूटिंगचे लोकेशन पाहण्यासाठी बाळा साखरकर यांच्या बोटीतून पद्मदुर्ग किल्ल्यावर गेलो होतो. नाना अगदी परखडपणे बोलायचे. कोणाला राग आला तरी आपले बोलणे बदलायचे नाहीत. किल्ल्याचे लोकेशन आणि फोटो काढण्यासाठी मला सोबत नेले होते,’अशी आठवण नाझरे यांनी सांगितली.
परतीच्या प्रवासात नानांना मासेमारी करण्याची हुक्की आली. बाळा साखरकर यांनी जाळे काढले. नानांनी स्वतः उंच उडी मारून जाळे पाण्यात टाकले आणि योगायोगाने तब्बल तीन फुटांचा मासा जाळ्यात सापडला. नाना प्रचंड खूश झाले. तो मासा खांद्यावर घेऊन ते मुरूडच्या किनाऱ्यावर उतरले. मासा घेऊन बाजारातून चालत जाताना त्यांच्या मागे कोळीवाड्यातील लहान मुलांची गर्दी झाली होती. “असा होता नाना,” असे सांगताना नाझरे भावुक झाले.
नाना मारुती नाक्यावर आप्पा खातू यांच्या घरीही राहत असत. नानांच्या वडिलांनी मुंबईच्या वातावरणापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना मुरूडला, सुर्वे मामांकडे पाठवले होते. हनुमान नाक्यावरील सुधीर दांडेकर, विभा दांडेकर यांच्यासह अनेक मित्रांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. जुन्या मित्रांना भेटण्यासाठी नाना आवर्जून मुरूडला येत असत. मुरूडच्या समुद्रकिनारी नानांनी आपल्या बालपणीच्या आठवणींसाठी जागाही घेतली होती. या जागेवर सुंदर घर उभारण्याची त्यांची इच्छा होती; मात्र काही कारणांमुळे ती इच्छा अपूर्ण राहिली. मुरूडच्या मातीत बालपण घालवलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने मुरूडचे नाव जगभर पोहोचवणाऱ्या नानांच्या जाण्याने शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठवणी आता मुरूडच्या समुद्राच्या लाटांसारख्याच कायम मनात घुमत राहतील. नानांचा आवाज थांबला असला, तरी मुरूडच्या आठवणींमध्ये त्यांचा जिवंतपणा कायम राहणार आहे.





