विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
आधार कार्डवरील नावात बदल करण्याची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून रखडली आहे. त्यामुळे रायगड तसेच ठाणे जिल्ह्यातील हजारो नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. 15 जूनपासून नाव बदलासाठी केलेले अनेक अर्ज अद्याप प्रक्रियेतच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे.
शासकीय राजपत्राच्या आधारे आधार कार्डवरील नावात बदल करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केले आहेत. मात्र, अर्ज करून बराच कालावधी उलटूनही आधारवरील नाव बदलले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे आधार कार्डवरील जुने नाव आणि इतर अधिकृत कागदपत्रांवरील नाव यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. या समस्येचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रक्रियेत आधार कार्डवरील नाव महत्त्वाचे असल्याने नाव अद्ययावत न झाल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश, शैक्षणिक कागदपत्रे तसेच आपार ओळख क्रमांक आणि इतर ओळख क्रमांक तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय विविध नोकरी आणि सरकारी भरती प्रक्रियेलाही या विलंबाचा फटका बसत आहे. आधारवरील नाव आणि शैक्षणिक कागदपत्रांवरील नावात तफावत असल्यास कागदपत्र पडताळणीच्या वेळी अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या समस्येबाबत नागरिकांकडून संबंधित विभागाला ई-मेलद्वारे वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. ग्राहक सेवा केंद्रावर दूरध्वनीद्वारे तक्रारी करूनही ठोस माहिती किंवा समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.






