| चणेरा | प्रतिनिधी |
धाटाव औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, युनिकेम कंपनीच्या धोरणांविरोधात स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कंपनीमध्ये गेली तीन ते पाच वर्षे प्रशिक्षणकालावधीत काम करणाऱ्या सुमारे 15 स्थानिक कामगारांना कायमस्वरूपी सेवेत न घेता थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टवर काम करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. उदरनिर्वाहाच्या आशेने कंपनीच्या अटी मान्य करून कामावर रुजू झालेल्या कामगारांनी भविष्यात कायम नोकरी मिळेल, या अपेक्षेने कठीण परिस्थितीत काम सुरू ठेवले. मात्र, प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होऊनही कायमस्वरूपी नियुक्ती न मिळाल्याने कामगारांमध्ये असंतोष वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांनी कंपनीविरोधात कडक भूमिका घेत विरोध दर्शविला आहे. धाटाव एमआयडीसीमध्ये आधीच कामगार सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जीव धोक्यात घालून रोजनदारीवर काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षिततेसह नोकरीची हमीही मिळत नसल्याने संताप वाढत आहे. “कामगार टिकला तर कारखाना टिकेल” या भावनेतून कंपनी व्यवस्थापनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.







