विकासाच्या नावाखाली जनतेच्या जीवाशी खेळ
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार आता उघडपणे संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उघड लूट आणि नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला धोकादायक खेळ आता उरणकरांच्या संतापाचा विषय बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी नरेश पवार यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कार्यालय आहे की भ्रष्टाचाराचे संरक्षित केंद्र? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
उरण तालुक्यात गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली. रस्ते, गटारे, संरक्षण भिंती, शासकीय इमारती, दुरुस्तीची कामे अशा विविध कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात अनेक कामांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते काही महिन्यांतच उखडले गेलेत. अनेक ठिकाणी संरक्षण भिंतींना तडे गेले असून काही भागात बांधकामांचे लोखंडी सळे बाहेर आलेले दिसत आहेत. उरणमधील अनेक शासकीय इमारती आता अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असल्याचे चित्र दिसत आहे. तरीदेखील त्या इमारतींमध्ये सरकारी कार्यालयांचा कारभार सुरूच असल्याने अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक रोज मृत्यूच्या सावलीत वावरत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विभागातील अनेक कामांचे वर्षानुवर्षे ऑडिटच झाले नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच दिली आहे. शासनाने मंजूर केलेला निधी नेमका कुठे खर्च झाला? कामे प्रत्यक्षात झाली का? निकृष्ट दर्जाच्या कामांसाठी कोण जबाबदार? याचा कोणताही स्पष्ट हिशोब उपलब्ध नसल्याने ‘पीडब्ल्यूडी’मध्ये आर्थिक घोटाळ्यांचे रॅकेट कार्यरत आहे का? अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. त्यामुळे उद्या एखादी दुर्घटना घडून निष्पाप लोकांचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नरेश पवार की संपूर्ण प्रशासन, असा संतप्त सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.







