। कळंबोली । प्रतिनिधी ।
कळंबोली सेक्टर 4 ई येथील जनता मार्केट परिसरात गुरुवारी (दि. 15) संध्याकाळी कौटुंबिक वादातून पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पिंकी मनीष गोप ऊर्फ सोनिया मोहम्मद अबू खातून असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती मनीष गोप याला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक तपासानुसार, पत्नीच्या गूगल पे आणि बँक खात्यात इतर व्यक्तींकडून पैसे जमा होत असल्याच्या कारणावरून पतीच्या मनात संशय निर्माण झाला होता. तसेच पत्नीचे अन्य व्यक्तींशी संबंध असल्याचा संशय त्याला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादातून पतीने पत्नीला मारहाण केल्याने तिला गंभीर दुखापत झाली. या दुखापतींमुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी पतीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर आणि पोलीस निरीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज सोनवणे, दिलीप चव्हाण, नितीन शिंदे तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले आणि अभय काळे यांनी या प्रकरणात कारवाई केली. या घटनेमुळे कळंबोली परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या मृत्यूचा पुढील तपास कळंबोली पोलीस करीत आहेत.







