किंवा बंद्यांना मिळाली नव्या आयुष्याची ‘आरोग्य किल्ली’; अलिबाग, तळोजा कारागृहातील बंद्यांना आरोग्यसेवा प्रशिक्षण
| श्रीवर्धन | वार्ताहर |
बंद्यांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सन्मानाने उभे करण्याच्या उद्देशाने अलिबाग आणि तळोजा कारागृहात राबविण्यात आलेला गृह-आरोग्य सहाय्यक प्रशिक्षण उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. ग्रामीण प्रगती फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या 420 तासांच्या शासकीय प्रमाणित अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा दोन्ही कारागृहांतील प्रत्येकी 30 अशा एकूण 60 पुरुष व महिला बंद्यांनी उत्तीर्ण केली.
स्वतंत्र त्रयस्थ मूल्यांकन संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर प्रशिक्षणाची सांगता झाली. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने या बंद्यांच्या तांत्रिक कौशल्यांना अधिकृत मान्यता मिळाली असून, कारागृहातून सुटका झाल्यानंतर आरोग्यसेवा क्षेत्रात रोजगार मिळविण्याचा मार्ग खुला झाला आहे. प्रशिक्षण घेतलेले उमेदवार आता वृद्ध, गंभीर आजारी रुग्ण तसेच विशेष काळजीची गरज असलेल्या व्यक्तींना व्यावसायिक पद्धतीने शुश्रूषा आणि आवश्यक वैद्यकीय देखरेख देण्यासाठी सक्षम झाले आहेत. आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेता हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
विशेष म्हणजे, बंद्यांना कौशल्याधारित आणि कायदेशीर रोजगाराचा मार्ग उपलब्ध करून देणे हा पुनर्वसन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाल्यास समाजात पुन्हा स्थिरपणे पुनर्वसन होण्यास मदत होऊन गुन्ह्यांच्या पुनरावृत्तीचा धोका कमी होण्यास हातभार लागू शकतो. दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या प्रमाणित उमेदवारांना सुटकेनंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक आरोग्य संस्था तसेच होम-केअर सेवा पुरवठादारांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कारागृहातून बाहेर पडल्यानंतर या 60 बंद्यांसमोर केवळ नव्या रोजगाराची संधीच नव्हे, तर नव्या आयुष्याची वाटही खुली होणार आहे.







