पालकमंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असताना अलिबाग-रोहा मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न कायम आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री भरत गोगावले यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र, आदेशाला अनेक दिवस उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्ड्यांची दुरुस्ती पूर्ण झालेली नसल्याने पालकमंत्र्यांच्या आदेशालाच प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जात असल्याची चर्चा सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, सोमवारी (दि. 14) घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. जिल्ह्यात एक लाख पाच हजार 54 खासगी आणि 291 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असतानाच रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मात्र कायम असल्याचे चित्र आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली अलिबागमध्ये विविध विभागांची बैठक झाली होती. या बैठकीत गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र, बैठक होऊन अनेक दिवस उलटूनही अलिबाग-रोहा मार्गावरील खड्ड्यांची पूर्णपणे दुरुस्ती झालेली नाही.
अलिबाग तालुक्यातील सुडकोली, नवघर, बेलकडे फाटा ते कुरुळ, वेळवली, खानाव ते एचपी कंपनीपर्यंत ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच बाप्पाच्या स्वागताच्या तयारीसाठी नागरिकांना याच खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. बाप्पाचे आगमन घराघरांत होणार; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे भक्तांना खड्ड्यांतूनच गणरायाला घरी आणण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही रस्त्यांची दुरुस्ती का रखडली, असा सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे.
दरम्यान, अलिबाग-रोहा मार्ग मंजूर असतानाही त्याची जबाबदारी संबंधित कंपनीकडून घेण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी अन्य ठेकेदारही पुढे येत नसल्याची चर्चा आहे. खड्डे बुजविण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ ठेकेदारांवर आली असल्याचे बोलले जात आहे. ठेकेदारांची मनधरणी करून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
श्री. पराते,
अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोली येथील खड्डे बुजविण्याचे काम शुक्रवारपासून सुरू केले आहे. अन्य भागातील रस्त्यांवरील खड्डेही तातडीने बुजविण्यात येतील. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदार मिळत नसल्याची अडचण आहे.
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग






