दोन दिवसांत 2,775 फेऱ्या; शनिवार-रविवारी आणखी 2,035 बसफेऱ्या
| रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमानी दाखल होण्यास सुरुवात झाली असून, एसटी महामंडळानेही प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. गुरुवार (दि. 10) आणि शुक्रवार (दि. 11) या दोन दिवसांत एसटीच्या तब्बल 2 हजार 775 फेऱ्या तळ कोकणाच्या दिशेने रवाना झाल्या. रविवार (दि. 13) पर्यंत एसटीच्या हजारो फेऱ्या कोकणात जाण्याची शक्यता महामंडळाने व्यक्त केली आहे.
बाप्पाच्या स्वागतासह सजावटीच्या तयारीसाठी मुंबई, ठाणे, पालघर, बोरीवली, नालासोपारा येथील चाकरमानी कोकणात येऊ लागले आहेत. अवघ्या दोन दिवसांवर गणरायाचे आगमन असल्याने तयारीसाठी चाकरमानी तळ कोकणाकडे रवाना होत आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे.
गणेशभक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदाही एसटी महामंडळाने कोकण प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात बसफेऱ्यांची व्यवस्था केली आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे विभागातून गुरुवारपासून तळ कोकणाच्या दिशेने एसटी बसेस रवाना झाल्या. गुरुवारी पहिल्या दिवशी 427, तर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी 2 हजार 348, अशा दोन दिवसांत एकूण 2 हजार 775 फेऱ्या कोकणाच्या दिशेने रवाना झाल्या. शनिवार (दि. 12) रोजी 1 हजार 840 आणि रविवार (दि. 13) रोजी 195, अशा एकूण 2 हजार 35 एसटी फेऱ्या कोकणाकडे जाणार आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा भार आणखी वाढणार आहे. दरम्यान, एसटीचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रायगड विभागाने खारपाडा ते कशेडीपर्यंत दहा ठिकाणी दुरुस्ती पथके तैनात केली आहेत. या पथकांकडून वाहनांमध्ये हवा भरण्यापासून आवश्यक दुरुस्तीची कामे करून एसटी बस तातडीने मार्गस्थ करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातून मुंबई, ठाणे परिसरात गणेशभक्तांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. या अतिरिक्त वाहतुकीचा नियमित प्रवाशांवर कोणताही परिणाम होणार नाही. जिल्ह्यातील नियमित प्रवाशांसाठी आवश्यक त्या प्रमाणात बस उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. त्यांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्यात आली आहे. महामार्गावर खारपाडा ते कशेडीपर्यंत रायगड विभागामार्फत दुरुस्ती पथके तैनात केली आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व आरामदायी करण्याचा प्रयत्न आहे.
सुहास चौरे,
विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड विभाग






