। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची आणि त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहून प्रसूत झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मो. तैस (20) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून, कामोठे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला तत्काळ अटक केली आहे.
या प्रकरणातील आरोपी मो. तैस कामोठे गावात राहण्यास असून, पीडित अल्पवयीन मुलगी देखील कामोठे परिसरात राहण्यास आहे. आरोपी मो. तैस याने पीडित मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. त्याने नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत पीडित मुलीवर तिच्या राहत्या घरी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. दरम्यान, पीडित मुलीने प्रियकराकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराची तसेच त्यामुळे गरोदर राहिल्याची माहिती आपल्या आई- वडिलांना सांगितली नाही. तसेच गरोदर असल्याचे देखील आई-वडिलांना कळू दिले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर ती गरोदर असल्याचे तिच्या कुटुंबियांना समजले. त्यामुळे कुटुंबियांनी तिला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. प्रसुती दरम्यान पीडित मुलीने मुलीला जन्म दिला आहे. प्रस्तूत झालेली पीडिता अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने कायदेशीर नियमांनुसार तात्काळ या प्रकरणाची माहिती कामोठे पोलिसांना दिली. त्यानुसार कामोठे पोलिसांनी पीडित मुलीचा सविस्तर जबाब नोंदवून आरोपी मो. तैस याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला तत्काळ अटक केली.






