शनिवारीही कमी दाबाने पुरवठा
। पनवेल । प्रतिनिधी ।
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरील देखभाल आणि नवीन फ्लोमीटर व व्हॉल्व बसविण्याच्या कामामुळे शुक्रवारी (दि.27) रोजी खारघर आणि कामोठे परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बेलापूर ते ऐरोलीदरम्यान विविध ठिकाणी ही कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत तब्बल 12 तास मुख्य जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या कामाचा थेट परिणाम सिडकोच्या खारघर आणि कामोठे नोडमधील नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, शनिवार (दि.28) रोजी सकाळी आणि संध्याकाळी होणारा पाणीपुरवठाही कमी दाबाने होणार आहे. सलग दोन दिवस पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होणार असल्याने नागरिकांना पाण्याची गैरसोय सहन करावी लागण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मुख्य जलवाहिनीवरील वितरण वाहिन्यांच्या टॅपिंगवर तसेच विविध जलकुंभांमध्ये नवीन फ्लोमीटर आणि व्हॉल्व बसविण्यात येणार आहेत. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांसह मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांवरही या कामाचा परिणाम होणार आहे.
दरम्यान, खारघर आणि कामोठे परिसरातील नागरिकांनी शुक्रवारच्या पाणीबंदचा विचार करून गुरुवारीच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांनी केले आहे.






