| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) स्पोर्ट्स क्लब आयोजित ‘पहिली व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धा 2026’ परळ येथील ऐतिहासिक विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या लाल मैदानावरील कै. विवेकानंद पैगावकर क्रीडानगरीत शानदार वातावरणात सुरू झाली. उद्घाटनाच्या दिवशीच मैदानावर चुरशीचे सामने, टाळ्यांचा कडकडाट आणि प्रत्येक गुणासाठी झुंज पाहायला मिळाली. आज झालेल्या सामन्यांत बँक ऑफ इंडिया, महावितरण कंपनी, नेवल डॉक आणि मुंबई पोलीस यांनी दमदार विजय नोंदवत विजयी सलामी दिली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राहुल सिन्हा (महाव्यवस्थापक, एचआरएमडी, सेंट्रल ऑफिस), भारताचे माजी कुस्तीपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेते पप्पू यादव तसेच आरबीआय स्पोर्ट्स क्लबचे जनरल सेक्रेटरी सचिन नरसप्पा उपस्थित होते.
व्यावसायिक गटाच्या पहिल्या सामन्यात बँक ऑफ इंडियाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 19-17 असा चुरशीच्या लढतीत 2 गुणांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात महावितरण कंपनीने गंदेकर इलेक्ट्रिकल्स प्रा. लि. वर 15-14 (मध्यंतर 13-6) असा 7.10 मि. राखून रोमांचक विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात नेवल डॉकने ठाणे स्पेशल पोलीस सेलचा 10-9 (मध्यंतर 8-5) असा 7.10 मि. राखून पराभव करत शानदार विजय नोंदवला. दिवसातील चौथ्या आणि सर्वाधिक रंगतदार सामन्यात मुंबई पोलिसांनी यजमान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संघावर 17-15 (मध्यंतर 9-9) असा 2 गुणांनी थरारक विजय मिळवला.







