मुसळधार पावसामुळे वीज यंत्रणा कोलमडली; युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू
| चणेरा | प्रतिनिधी |
चणेरा विभागात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून, अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. सततच्या पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उच्च दाबाच्या वीजवाहिन्या आणि विद्युत खांबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी अनेक गावांमध्ये चार दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. मोबाईल चार्जिंग, घरगुती कामे, लघुउद्योग आणि व्यावसायिक व्यवहारही ठप्प झाले आहेत. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे खांब कोसळून जमिनीवर पडले आहेत. अनेक भागात रस्ते चिखलमय झाल्याने आणि दुर्गम ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत असल्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. तरीही वीज वितरण विभागाचे कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत काम करत असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. चार दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित वीज वितरण विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.
संदीप म्हात्रे
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी उच्च दाब वाहिनीचे विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडचणी येत आहेत. नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी मुरुड उपकेंद्रातून पर्यायी (डायव्हर्ट) वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी विद्युत खांब पडले आहेत, तेथे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरात लवकर नियमित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आमचे पथक प्रयत्नशील आहे.
कनिष्ठ अभियंता चणेरा विभाग







