चिरनेरमध्ये कचरा व्यवस्थापन ठरतेय कुचकामी

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर गावाची दिवसागणिक वाढत असलेली लोकसंख्या व विस्तार यांच्या तुलनेत येथील काही विघ्नसंतोषी माणसांच्या पराक्रमामुळे येथील कचरा व्यवस्थापन कुचकामी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गावातील कचरा साठा करण्याकरता ग्रामपंचायतीने 50 डसबिनची व्यवस्था केली आहे. परंतु या डसबिनमध्ये कचर्‍याबरोबर मेलेल्या कोंबड्या, कुत्री, उंदीर, घुशी आणि कधीकधी दगड-माती टाकण्याचा पराक्रम काही गावातील विघ्नसंतोषी माणसे जाणून बुजून करीत असल्यामुळे ग्रामपंचायतीने गावात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले सर्व डसबिन नाईलाजाने काढून टाकण्यात आल्या आहेत. आता केवळ दररोज घंटागाडी संपूर्ण गावात फिरून कचरा गोळा करीत आहे. गावातील बहुतांशी नागरिक या गावात फिरत असणार्‍या घंटागाडीच आपापल्या घरातील केरकचरा नियमितपणे टाकत आहेत.पण काही ग्रामस्थ उघड्यावर मध्यवर्ती असलेल्या नाल्यात कचरा टाकत असल्यामुळे मोक्याच्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

गावातील मध्यवर्ती नाल्यात टाकण्यात येणारा कचरा यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणार आहेच. पण सध्या मोक्याच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले असून असाह्य दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचबरोबर कचर्‍याच्या ढिगार्‍यातील प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन गुरांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. वातावरणातील बदल आणि घाण दुर्गंधीमुळे साथीचे आजार व रोगराई पसरण्याची भीती वर्तवली जात आहे.

Exit mobile version