|चौल | प्रतिनिधी |
महावितरणच्या स्मार्ट मीटर अभियानात अलिबाग विभागातील चौल-२ शाखा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत रायगड जिल्ह्यातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटर बसविलेले शाखा कार्यालय होण्याचा मान मिळविला आहे. शाखेअंतर्गत असलेल्या सर्व १,५७० वीज ग्राहकांचे मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
महावितरणकडून राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असून कोंकण प्रादेशिक विभागाने आतापर्यंत सर्वाधिक ४३ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसविले आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण मंडळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १०५ शाखा कार्यालये असून त्यामध्ये चौल-२ शाखेने ही कामगिरी सर्वप्रथम पूर्ण केली आहे.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक व पारदर्शक वीजबिल मिळत असून मोबाईल अॅपद्वारे वीज वापरावर थेट लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. वेळेनुसार वीज वापराचे नियोजन करून ग्राहकांना बिलात बचतही करता येत आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३.४० लाख ग्राहकांना स्मार्ट मीटरमुळे एकूण २.८३ कोटी रुपयांची वीजबिल सवलत मिळाल्याची माहिती महावितरणने दिली.
स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची माहिती तात्काळ उपलब्ध होत असल्याने बिलिंगमधील त्रुटी, वीज चोरी आणि मीटरमधील छेडछाड रोखण्यास मदत होत आहे. तसेच वीजपुरवठ्याचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येत असल्याने सेवा अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह बनत आहे.
ही यशस्वी मोहीम राबविण्यासाठी चौल-२ शाखेचे अभियंता देव्रत पवार व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांमध्ये व्यापक जनजागृती व प्रबोधन केले. अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड आणि उपविभागीय अधिकारी तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या कामगिरीबद्दल भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.






