कबड्डी संघात जोरदार चुरस; चार संघ चौथ्या फेरीत दाखल
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा विक्रोळी (प.) येथील महापालिका मैदानात सुरु असून, प्रथम श्रेणी गटात स्पर्श फांऊडेशन, स्वस्तिक मंडळ, पार्ले महोत्सव स्पोर्टस् आणि टागोरनगर मित्रसिद्धिविनायक यांनी चौथी फेरी गाठली.
या स्पर्धेतील प्रथम श्रेणी पुरुषांच्या तिसऱ्या फेरीत स्पर्श फांऊडेशनने संघर्ष मंडळाचा संघर्ष 39-16 असा संपविला. विश्रांतीला 18-07 अशी आघाडी घेणाऱ्या स्पर्शने नंतर देखिल त्याच त्वेषाने खेळ करीत आपला विजय सोपा केला. अभिजित बाधवल, आकाश आरसूल या विजयात चमकले. संघर्षचा मारुती आर. के. बरा खेळला. स्वस्तिक मंडळाने सुजल सावंत, प्रफृल्ल चव्हाण यांच्या चढाई पकडीच्या जोशपूर्ण खेळाने अमरज्योतला 25-17 असे नमविले. अमरज्योतच्या मयुरेश कोयंडे, सुधांशु सोळंकी यांनी चूरशीची लढत दिली.
पार्ले महोत्सव स्पोर्टस्ने संकल्प प्रतिष्ठानवर 38-20 अशी मात केली. मध्यंतरला 17-14 अशी आघाडी घेणाऱ्या पार्ले महोत्सवने नंतर टॉप गिअर टाकत सामना आपल्या बाजूने झुकविला. अक्षय तावडे, इरफान अन्सारी यांच्या चतुरस्त्र खेळाने विजयाची किमया साधली. संकल्पच्या प्रथमेश मोरेची लढत एकाकी ठरली. टागोरनगर मित्र मंडळाने सनीला शिंदे, अक्षय देशमुख यांच्या चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळाने श्री सिद्धी श्री सिद्धीचा संघाचा 32-19 असा पाडाव केला. श्री सिद्धिविनायकने मुलुंड क्रीडा केंद्राचा 50-19 असा धुव्वा उडवीला. ओम कुदळे, सुजल गुप्ता यांच्या झंजावती खेळाने श्री सिद्धिविनायकने दोन्ही डावात 25-25 गुण मिळवीत अर्धशतक गाठले. मुलुंड केंद्राचा रोहित राठोड बरा खेळाला. शूर जवान कबड्डी संघाने निखिल चव्हाण, साहिल प्रत्यने यांच्या चतुरस्त्र खेळाने श्री सिद्धी क्रीडा मंडळावर 31-24 असा विजय मिळविला. सिद्धी कडून रोहित सिंग, तुषार कांबळी यांनी कडवी लढत दिली.






