आयात-निर्यात साखळी विस्कळीत; देशभरातील उद्योगाला फटका
| चिरनेर | प्रतिनिधी |
जेएनपीए बंदरात अचानक कंटेनरची गर्दी निर्माण झाल्याने देशभरातून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या आयात-निर्यातीच्या संपूर्ण पुरवठा साखळीत व्यत्यय येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये जहाजांसाठी मोठा प्रतीक्षा कालावधीत वाढ होत चालली आहे. यामुळे खिशावर मोठा भार पडत असल्याने निर्यातदारांना आणखी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्सने व्यक्त केली आहे.
जेएनपीए बंदरावरील कंटेनरच्या साठ्यामुळे जहाजांना धक्क्याला लागण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागत आहे. कंटेनर यार्डमध्ये जागेची कमतरता आणि ट्रक हाताळणीतील विलंबामुळे माल वेळेवर रवाना होण्यास अडथळा येत आहे. या विलंबामुळे निर्यातदारांवर अतिरिक्त लॉजिस्टिक्स खर्च, कंटेनर डिटेंशन आणि डेमरेज शुल्क (विलंब शुल्क) या स्वरूपात मोठा आर्थिक भार पडत आहे. विदेशी खरेदीदारांना वेळेवर माल पोहोचवण्यात येणारी असमर्थता हे सर्वात मोठे आव्हान आहे, ज्यामुळे व्यापारी संबंधांवर ताण येण्याचा धोका वाढला आहे.
देशभरातुन विविध मालाची मोठ्या प्रमाणात आयात निर्यात केली जाते. यामध्ये उत्तर प्रदेशातील अनेक प्रमुख औद्योगिक शहरे त्यांच्या तयार मालाचा मोठा भाग विदेशात पाठवण्यासाठी जेएनपीए बंदरावर अवलंबून आहेत. या गर्दीचा राज्यातील कानपूर येथील चामड्याचा आणि घोड्यांच्या सामानाचा (सॅडलरी) उद्योग, नोएडातील तयार कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोरादाबाद येथील पितळेच्या वस्तू आणि हस्तकला, भदोही आणि वाराणसी येथील गालिचे, हातमाग आणि वस्त्रोद्योग, आग्रा आणि अलीगढ येथील पादत्राणे, हार्डवेअर आणि कुलूप उद्योगांवर थेट परिणाम झाला असल्याचे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्सचे सहायक संचालक आलोक श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्सच्या कानपूर येथील कार्यालयाने या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशचा निर्यात व्यापार सुरळीतपणे सुरू राहाण्यासाठी बंदर प्राधिकरण, सीमाशुल्क आणि केंद्र सरकारला अतिरिक्त यार्ड क्षमता आणि रेल्वे-रस्ते वाहतूक वाढवून ही अडचण लवकरात लवकर दूर करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचेही आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले.
मध्यपूर्वेतील देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि अतिवृष्टी, वादळ आणि खराब हवामानामुळे काही तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा जहाजांना बंदरात ये-जा करण्यासाठी विलंब होतो. या अडचणींमुळे खबरदारी म्हणून अधुनमधून जहाजांनाही बंदरात कार्गो चढउतार करण्यास मनाई केली जाते. यामागे आयात-निर्यातदार व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याचीही दक्षता घेतली जाते.
रविशकुमार सिंह,
जेएनपीए-उपाध्यक्ष.






