| माणगाव | प्रतिनिधी |
समाजाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या द. ग. तटकरे महाविद्यालयात राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त उत्साहात पार पडला. बालरोग तज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून आरोग्यदायी समाज आणि हिरवेगार पर्यावरण या दोन्हींचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या द. ग. तटकरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 7 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण सप्ताहाचा प्रारंभ 1 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाने करण्यात आला. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. संस्थेचे सचिव कृष्णा गांधी यांनीही या पर्यावरणपूरक उपक्रमाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी ‘वृक्ष ही काळाची गरज आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही संतांची शिकवण आज अधिक महत्त्वाची ठरते. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन केले. त्यांनी आरोग्य आणि पर्यावरण यांचा अतूट संबंध स्पष्ट करत निरोगी जीवनासाठी हिरवळ जपण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
यावेळी डॉ. सचिन माळी, डॉ. परेश उभारे, डॉ. रोहित गोविलकर आणि डॉ. हेमंत गांधी हे मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. आर. पांडेय, उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र आचार्य, प्रा. नेहा तुराई, डॉ. संगीता उतेकर, प्रा. अंकिता म्हस्के, तसेच नेचर क्लबच्या प्रमुख प्रा. उर्मिला खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







