सुप्रिया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
सहकार क्षेत्रातील विश्वासार्ह आणि ग्राहकाभिमुख बँक म्हणून ओळख असलेल्या अलिबाग को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडच्या थेरोंडा शाखेचे नवीन व प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या नव्या शाखेचे उद्घाटन बँकेच्या चेअरमन सुप्रिया जयंत पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यामुळे थेरोंडा परिसरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि खातेदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलिबाग तालुक्यातील थेरोंडे फाटा अलिबाग को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडची नवीन शाखा अधिक प्रशस्त, सुसज्ज आणि ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणारी आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी ती मोठी सुविधा ठरणार आहे. ग्रामीण व उपनगरी भागातील नागरिकांना सुरक्षित, जलद आणि दर्जेदार बँकिंग सेवा देण्याच्या उद्देशाने बँकेने हे पाऊल उचलले असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. या नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन सुभाष म्हात्रे, संचालक मंडळाचे सदस्य नितीन म्हात्रे, सुरेश खोत, निलेश खोत, खलिल तांडेल, माजी सरपंच मनिषा चुनेकर, हेमंत गणपत, शरद पाटील, संगीता पाटील, मधुकर फुंडे, सरोज वरसोलकर, संदीप खोत, अमित फुंडे, प्रमोद नवखारकर, डॉ. विजय वरसोलकर, शरद वरसोलकर यांच्यासह मोठ्या संख्येने खातेदार व नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी नवीन वास्तूची विधिवत पूजा शरद पाटील आणि संगीता पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. धार्मिक विधीनंतर चेअरमन सुप्रिया जयंत पाटील व सुरेश खोत यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांनी फीत कापून शाखेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत नव्या शाखेच्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना सुप्रिया पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक बँकिंग सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असून, थेरोंडा शाखेच्या नव्या वास्तूमुळे ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देणे हेच आमचे ध्येय आहे.” असे त्यांनी सांगितले.







