| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी|
श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे सर्फराज व जावेद कमाल काजी यांच्या मालकीच्या आंबा बागायतीला शनिवारी (दि.6) दुपारी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आग अज्ञात व्यक्तीने जाणूनबुजून लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आगीची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी स्वप्निल रासने आणि आकाश पोळ यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडक ऊन परिसरातील वाळलेले गवत आणि वेगाने पसरणाऱ्या ज्वाळांमुळे आग नियंत्रणाबाहेर गेली. परिणामी आंबा आणि काजूची अनेक झाडे होरपळली. या आगीत काजी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील जैविविधता, वनस्पती आणि पर्यावरणालाही फटका बसला आहे. विशेष म्हणजे ही आग गावठाणाच्या अगदी वस्तीजवळ लागली होती. आग वस्तीपर्यंत पोहोचली असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता. या घटनेची बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.






