| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, सोमवारी रात्री बोरघाटातील मिसिंग लिंक बोगद्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला. भरधाव कंटेनरने समोरील आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे टेम्पो तिसऱ्या मार्गिकेत जाऊन ट्रकवर आदळला. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, कंटेनरचालक घटनास्थळावरून फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (एमएच 46 सीयू 2167) पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. बोरघाटातील मिसिंग लिंक बोगद्यापुढे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने आयशर टेम्पो (एमएच 53 बी 2167) याला धडक दिली. धडकेमुळे टेम्पो तिसऱ्या मार्गिकेत जाऊन ट्रक (टीएन 76 एएल 6285) वर आदळला. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा, खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. वाहनांमध्ये अडकलेल्या चालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. दरम्यान, फरार कंटेनरचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.






