| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील धामोते गावातील स्मशानभूमी ग्रामपंचायतीच्या मालकी जमिनीवर उभारावी, अशी मागणी संजय विरले यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या खासगी जमिनीवर स्मशानभूमी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन मोकळी असल्याने तेथे शेड उभारण्याची कार्यवाही करावी. तसेच, ग्रामपंचायत मालकीच्या जमिनीची तात्काळ मोजणी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
धामोते गावातील स्मशानभूमी सध्या खासगी मालकाच्या जागेत आहे. या जागेतून स्मशानभूमी शेड काढून ग्रामपंचायत मालकीच्या जागेत बांधण्यात येईल, असे पत्र कोल्हारे ग्रामपंचायतीने जमीन मालक आशा भोईर यांना दिले आहे. मात्र, अनेक वर्षे उलटली तरी ग्रामपंचायतीने आपल्या मालकीच्या जमिनीत स्मशानभूमी शेड बांधलेली नाही. सध्या धामोते गावातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय असून, ती खासगी जागेत असल्यामुळे आवश्यक दुरुस्ती व विकासकामे करता येत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात तसेच इतर वेळी अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ संजय विरले यांनी ग्रामपंचायत मालकीच्या जमिनीची मोजणी करून तेथे तात्काळ स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जमिनीची मोजणी तात्काळ करून घेण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांनी कोल्हारे ग्रामपंचायत अधिकारी संजय राठोड यांना दिले आहेत.






