खाडीकिनारी मृत माशांचा खच;रसायनमिश्रित सांडपाण्याचा प्रादुर्भाव
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील दिघोडे खाडीत केमिकलचे पाणी सोडण्यात आल्यामुळे या खाडीतील हजारो मासे व इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे सुमारे अडीच हजार मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यांचा रोजगार धोक्यात आला आहे. तसेच, दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दिघोडे खाडीत केमिकलचे पाणी सोडणाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करावी आणि मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांच्यासह स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
नुकत्याच प्लाटीनम लाँजिस्टीक या गोदामाला लागलेल्या भीषण आगीतील केमिकलयुक्त सांडपाणी दिघोडे-वेश्वी खाडीत सोडल्याने हजारो मासे आणि जलचर मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. अशोक कोळी व समिर नाईक या पारंपरिक मासेमारी करणाऱ्या बांधवांनी सांगितले की, वेश्वी येथील प्लाटीनम लाँजिस्टीक या मालाची साठवणूक करणाऱ्या गोदामाला सोमवारी (दि.16) भीषण आग लागण्याची घटना घडली. या गोदामात केमिकलचा मोठा साठा असल्याने स्फोट होऊन परिसर हादरून गेला होता. ही आग विझवण्यासाठी फोमचा मारा न केल्याने व अग्निशामक सुविधा उपलब्ध नसल्याने आज दहा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान गोदामात प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी हे केमिकल मिश्रित झाल्यानंतर ते थेट नाल्याद्वारे दिघोडा-वेश्वी खाडीत सोडले गेले. त्यामुळे या खाडीतील जिताडा, चिंबोरे, कोंळबी, फणटूस आणि बोईट माशांसह इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे खाडीतील वाढत्या प्रदूषणामुळे दोन ते अडीच हजार मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यांचा रोजगार धोक्यात आला आहे. त्यामुळे येथील मच्छीमार बांधवांना गोदाम मालकांनी नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आमचा उदरनिर्वाह हिरावून घेणाऱ्या प्लाटिनम या गोदाम मालकांविरोधात उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा, स्थानिक मच्छिमार बांधवांनी दिला आहे. दरम्यान, दिघोडे खाडीत केमिकलयुक्त सांडपाणी सोडल्याने हजारो मासे आणि जलचर मृत्युमुखी पडल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. खोपटा, दिघोडे-वेश्वी खाडीतील प्रदूषणामुळे दोन ते अडीच हजार मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी शासनाने या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई देण्याची पुढाकार घ्यावा, अशी मागणी दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी केली आहे.
कठोर कारवाईची मागणी
वेश्वी व दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील गोदाम व्यवस्थापकांनी केमिकलमिश्रित विषारी रासायनिक पदार्थ कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता खाडीत सोडण्याचे काम करण्यात आले आहे. हे शासनाच्या नियमांची पायमल्ली करून सुरू केले आहे. त्यामुळे खाडीतील मासे व जलचर प्राणी मृत्युमुखी पडून सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याने उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती स्थानिका मच्छिमारांनी दिली आहे. तरी केमिकलचे पाणी सोडणाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करावी आणि पारंपरिक मासेमारी करणाऱ्या बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
मासेमारी व्यवसाय धोक्यात
उरणमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प, कंटेनर यार्ड, गोदामे उभी राहिली आहेत. मात्र, या प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नसून, परप्रांतीय नागरिकांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत येथील तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड ओढवली जात आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून स्थानिक प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे खोपटा, दिघोडा-वेश्वी खाडीमध्ये घातक रसायनमिश्रित सांडपाणी सोडण्यात येत असल्याने येथील मासेमारी व्यवसाय देखील धोक्यात आला आहे.
दिघोडे खाडीत मासे मृत पडले आहेत. ही घटना खरी असून, यासंदर्भात माहिती घेऊन या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित गोदामाला नोटीस बजावण्यात येणार आहे.
डॉ. उद्धव कदम,
तहसीलदार, उरण
दिघोडे-वेश्वी खाडीत मासे मृत पडले आहेत.त्या परिसरातील दुषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रदुषण नियंत्रण मंडळ,
बेलापूर-नवीमुंबई






