अपघाताची टांगती तलवार
| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहने बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने येथील वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. रस्ते व्यापून उभ्या असलेल्या या वाहनांमुळे रोज लहान-मोठे अपघात होत असून, नागरिकांसह स्थानिक कामगारांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
औद्योगिक वसाहतीत विविध कंपन्यांमध्ये कच्चा आणि पक्का माल वाहून नेण्यासाठी दररोज शेकडो ट्रक, टँकर आणि ट्रेलरची ये-जा सुरू असते. मात्र, अनेक वाहनचालक आपले टँकर व अवजड वाहने थेट मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्ताव्यस्तपणे उभी करतात. रस्त्याच्याकडेला लागलेल्या या वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे रस्ते अत्यंत अरुंद झाले आहेत. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने वळणांवर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच रात्रीच्या वेळी पुरेशा दिव्यांचा अभाव असल्याने रस्त्यात उभ्या असलेल्या या वाहनांवर आदळून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत.
धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करताना कामगार, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीच होत आहे. संबंधित प्रशासन, एमआयडीसी अधिकारी आणि वाहतूक पोलीस या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व कामगार संघटनांकडून केला जात आहे. कंपन्यांनी स्वतःच्या परिसरातच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे. धृतराष्ट्राची भूमिका घेणाऱ्या औद्योगिक विकास मंडळ प्रशासनाने या बेशिस्त पार्किंगवर तात्काळ कठोर कारवाई केली नाही आणि रस्त्यावरील ही धोकादायक वाहने योग्य ठिकाणी उभी केली गेली नाही, तर येत्या काळात सर्व कामगार वर्ग एकत्र येऊन येथील कार्यालयावर मोर्चा घेऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.







