दिवसभराची मजुरी सुटणेही झाले कठीण; काळाच्या ओघात कलेला उतरती कळा
| धाटाव | प्रतिनिधी |
गावोगावी आणि गल्लीबोळात फिरून ॲल्युमिनियम किंवा पत्र्याच्या डब्यांना झाकणे बसवून देणाऱ्या कारागिरांचा पारंपरिक व्यवसाय सध्या आता लोप पावत चालला आहे. यामुळे डबा, झाकण कारागिरांचा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर असून गल्लीबोळात घुमणारी ‘डब्याला झाकण बसवून घ्या’ ही हाक सुद्धा बदलत्या जमान्यात हळूहळू पूर्णपणे मौन झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
पूर्वीच्या काळी घराघरांत धान्य, तेल, तूप आणि इतर किराणा सामान साठवण्यासाठी धातूचे मोठे डबे वापरले जात असत. वापरून वापरून या डब्यांची झाकणे खराब होणे, सैल होणे किंवा तुटणे अशा समस्या वारंवार निर्माण होत असत. अशा वेळी ‘डब्याला झाकण बसवून घ्या’ अशी हाक मारत गल्लीतून जाणारे कारागीर गृहिणींसाठी मोठे मदतगार ठरत असत. हे कारागीर स्वतःजवळ पत्र्याचे तुकडे, कात्री, हातोडी आणि सांधणीचे (सोल्डरिंग) साहित्य घेऊन गावोगावी, गल्लोगल्ली फिरत असत. अत्यंत रास्त दरात आणि अगदी काही मिनिटांत हे कारागीर मंडळी आपल्या कल्पकतेने डब्याला अचूक आकाराचे झाकण तयार करून बसवत. मात्र, काळाच्या ओघात बदललेल्या जीवनशैलीमुळे या पारंपरिक व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.
सध्या बाजारात ॲल्युमिनियम किंवा पत्र्याच्या डब्यांची जागा प्लास्टिक, फायबर आणि स्टेनलेस स्टीलच्या डब्यांनी घेतली आहे. प्लास्टिक आणि फायबरचे डबे वजनाने हलके, स्वस्त आणि आकर्षक रंगांत उपलब्ध असल्याने ग्राहकवर्गाने अशा साहित्याला अधिकाधिक पसंती दिली आहे. आधुनिक एर-टाईट डब्यांमुळे अन्नाला किंवा धान्याला कीड लागत नाही, ज्यामुळे जुन्या डब्यांचा वापर कमी झाला आहे.
प्लास्टिकचे डबे खराब झाल्यास ते दुरुस्त करण्याऐवजी थेट नवीन डबा खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. परिणामी, डब्यांना झाकणे बसवणाऱ्या या फिरत्या कारागिरांकडील कामाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. दिवसभर पायपीट करूनही दिवसभराची मजुरी सुटणे कठीण झाल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यातच वाढत्या महागाईने डोके वर काढल्यामुळे त्यातच कच्च्या मालाचे वाढलेले दर यामुळे हा व्यवसाय करणे कारागिरांना परवडने जोगे नाही. नवीन पिढीतील तरुणांनी या व्यवसायात रस न दाखवल्याने ही कला आता सुद्धा सध्या इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. या कारागिरांवर उपजीविका भागवणारी अनेक कुटुंबे आता मोलमजुरी किंवा इतर लहान-मोठ्या कामांकडे वळली आहेत. ग्रामीण भागातही रेडीमेड वस्तूंचे प्रमाण वाढल्याने गावगाड्यातील ही एक महत्त्वाची सेवा आता इतिहासजमा होत आहे.
छोटे व्यवसाय नष्ट
आधुनिकतेच्या आणि 'यूज अँड थ्रो' संस्कृतीच्या प्रभावामुळे अनेक पारंपरिक हस्तकला आणि छोटे व्यवसाय नष्ट होत आहेत. जुन्या वस्तूंची दुरुस्ती करून त्या दीर्घकाळ वापरण्याची मानवी वृत्ती आता हळूहळू कमी होत चालली आहे. यामुळेच एकेकाळी गल्लीबोळात घुमणारी 'डब्याला झाकण बसवून घ्या' ही हाक आता हळूहळू पूर्णपणे मौन झाल्याचे दिसून येत आहे.







