पाकिस्तानात रेल्वे अपघातात 30 ठार


इस्लामाबाद | वृत्तसंस्था |
पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात 30 प्रवासी मरण पावले असून, शेकडो जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, एका एक्स्प्रेस गाडीच्या धडकेमुळे दुसरी एक्स्प्रेस रुळावरून खाली घसरली. दक्षिण पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात ही सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे.

असोसिएटेड प्रेसनं या रेल्वे अपघाताचं वृत्त दिलं आहे. सिंध प्रांतात असलेल्या घोटकी जिल्ह्यात दोन एक्स्प्रेस गाड्यांची धडक झाली. सर सय्यद एक्स्प्रेस रेल्वे गाडीने धडक दिल्यानं मिल्लत एक्स्प्रेस रुळावरून घसरली, अशी माहिती घोटकी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उस्मान अब्दुल्ला यांनी दिली. रेती आणि डहार्की रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. यात जवळपास 30 प्रवासी मरण पावले असून, असंख्य जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केलं. यावेळी परिसरातील गावकरीही पोलिसांच्या मदतीला धावून आले. मृत आणि जखमी प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्यात गावकर्‍यांनी मदत केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अपघातांचं कारण कळू शकलेलं नाही, अशी माहिती अब्दुल्ला यांनी दिली. एएनआयनेही स्थानिक वृत्त वाहिनीच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.

Exit mobile version