। दुबई । वृतसंस्था ।
कर्णधार रोहित शर्माची झटपट अर्धशतकी खेळी, श्रेयस अय्यरची उत्तम फलंदाजी आणि फिरकीपटू, विशेषत: वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत तिसर्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर जिंकली आहे. भारताने तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
याआधी 2002 मध्ये भारताने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे, तर 2013 मध्ये कॅप्टन कूल एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. गतवर्षी जूनमध्ये भारताने टी-20 विश्वचषक उंचावला होता. रविवारच्या विजयासह भारताने 2000 मध्ये न्यूझीलंडकडूनच अंतिम फेरीत पत्करावा लागलेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. रोहितने आक्रमक पवित्रा घेत आठव्या षटकात नॅथन स्मिथच्या गोलंदाजीवर 2 चौकार आणि 1 षटकार मारून 14 धावा काढल्या.
भारताने 7.2 षटकांत 50 धावांचा टप्पा ओलांडला होता. पॉवरप्लेच्या 10 षटकांच्या अखेरीस, भारताने 64/0 धावा केल्या. ज्यात रोहित (49) आणि गिल (10) नाबाद होते. रोहितने 41 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. रोहितने फिरकीपटूंविरुद्ध चौकार मारणे सुरू ठेवले आणि भारताने 17 षटकांत 100 धावांचा टप्पा गाठला.
रोहित आणि गिल यांच्यातील 105 धावांची भागीदारी मिचेल सँटनरने गिलला बाद करून तोडली, ग्लेन फिलिप्सने कव्हर्सवर अप्रतिम झेल घेतला. गिल 50 चेंडूत 1 षटकारासह 31 धावा करून बाद झाला. भारताची 18.4 षटकांत 105/1 अशी स्थिती होती. मायकल ब्रेसवेलने विराट कोहलीला केवळ 1 धावावर बाद केले. भारताची 19.1 षटकांत 106/2 अशी स्थिती झाली. फिरकीपटूंनी किवी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले, रचिन रवींद्रने रोहितला 83 चेंडूत 76 धावांवर (7 चौकार आणि 3 षटकार) बाद केले. भारताची 26.1 षटकांत 122/3 अशी स्थिती होती.
मुख्य म्हणजे 2013 प्रमाणेच भारताने यंदाही संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून विजेतेपद काबिज केले. 2002 मध्ये सौरव गांगुली, तर 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. 2017 मध्ये भारताला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता 8 वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय प्रकारातील स्पर्धेत भारताने अजिंक्यपद काबिज केले. रोहितच्या नेतृत्वात भारताचे हे सलग दुसरे आयसीसी जेतेपद ठरले आहे.