पारंपरिक शेतीबरोबर नाविन्यपूर्ण शेती करा

रायगड

रोहा, प्रतिनिधी |

पावसाळा आला की कोकणातील शेतीचे प्रमुख पीक असणार्‍या भाताचे उत्पादन घेण्यासाठी येथील शेतकर्‍यांची लगबग सुरू होते. पण, पारंपरिक शेतीबरोबरच कोकणातील शेतकर्‍यांनी नाविन्यपूर्ण शेती करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करावी, यासाठी कृषी विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी दिली आहे.

यावर्षी रोहा तालुक्यात सरासरी 9741 हेक्टर क्षेत्रात भाताची तर 155 हेक्टर क्षेत्रात नाचणी या पारंपरिक पिकांची लागवड होईल, असा अंदाज जाधव यांनी व्यक्त केला आहे. या क्षेत्रात दहा टक्के वाढ करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. बाजारात सुमारे 70-80 प्रकारची विविध कंपन्यांची बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सुवर्णा, जया, वाय एस आर, वाडा कोलम, सारथी, कोमल 101, जोरदार, ज्योतिका, हर्षिता, पूजा, कावेरी सोना, कर्जत 3, शुभांगी, कर्जत 9, लोकनाथ या भाताच्या वाणाना चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांवर शेतकर्‍यांसाठी 1776 मेट्रीक टन बियाणे मागविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यासाठी 1082 मे टन खतांची मागणी करण्यात आली असून यामध्ये युरिया,सिंगल सुपर फॉस्फेट,म्युरेट फोटेस्ट,15.15.15 सुफला ,डीएपी 1846 या खतांचा समावेश आहे.

पारंपरिक फळपीक लागवडीबरोबर हमखास उत्पन्न देणार्‍या पपई आणि शेवगा यांची देखील लागवड केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर तालुक्यातील 50 शेतकरी यावर्षी स्वतःच्या 10 गुंठे जागेत हळद लागवड करणार असून करटोली या रानभाजीला असणारी वाढती मागणी आणि मिळणारा चांगला भाव लक्षात घेऊन करटोली या रान भाजीचे उत्पादन घेण्यासाठी तालुक्यातील 20 शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवश्यक सर्व मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेहमीच तत्पर असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.

Exit mobile version