। तळा । प्रतिनिधी ।
गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पावसाचे आगमन लवकरच होणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्याचे महावितरण विभागापुढे आवाहन असणार आहे.
तळा तालुक्यात भारनियमनामुळे वीज गायब होण्याचे प्रमाण जास्त आहे. ग्राहकांकडून वीजबिल वसुली करण्यात नेहमी अग्रेसर असलेल्या महावितरण विभागाला सुरळीत वीज पुरवठा ठेवणे मात्र नेहमी अवघड जाते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून पावसाळ्यापूर्वी महावितरण विभागाकडून करण्यात येणारी कामे अद्यापही करण्यात आलेली नाहीत. जीर्ण झालेले विद्युत खांब, विद्युत तारांजवळ वाढलेली झाडे, उघड्या डीपी यांसारखी कामे अद्यापही महावितरण विभागाकडून करण्यात आलेली नाहीत. महावितरण विभागाचे कर्मचारी वीजबिल वसुलीच्या कामात एवढे मग्न झाले आहेत की, त्यांना ही कामे करण्यासाठी वेळच मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
झाडे तोडणे, बॉक्स मेंटनन्स, ब्रेकर मेंटेनन्स, जिओडी मेंटेनन्स, जीर्ण खांब बदलणे यांसारखी पावसाळीपूर्व कामे महावितरण विभागाकडून पूर्ण केली जातात. मात्र सध्या सुरू असलेला विजेचा लपंडाव पावसाळ्यातही कायम राहिला नाही म्हणजे झालं, अशी अपेक्षा तळावासीयांकडून व्यक्त केली जात आहे.







