पुण्यात ‘शुटींग लिग ऑफ महाराष्ट्र’चे उद्घाटन; महाराष्ट्रातून 18 जिल्हा संघाचा समावेश
| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णपान जोडत, ‘शूटिंग लीग ऑफ महाराष्ट्र’ चा शानदार उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला आहे. ही महाराष्ट्रातील पहिलीच नेमबाजी लीग असून, भारतीय नेमबाजी लीगच्या धर्तीवर तिचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील धुरंधर नेमबाज आपले कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहावयास मिळाले. सुमारे दीडशे खेळाडूंनी घेतलेला अचूक वेध या स्पर्धेच्या निमित्ताने पाहावयास मिळाला.
या लीगची सुरुवात 17 ते 19 एप्रिल 2026 दरम्यान झाली. पुण्यातील अमनोरा पार्क येथील छत्रभुज नरसी स्कूलमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र रायफल असोसिएशन द्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी अनेक प्रतिष्ठित ऑलिम्पिकपटू आणि नेमबाजी प्रशिक्षक उपस्थित होते, ज्यांनी या लीगला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्रात प्रथमच, एसएलएम सांघिक स्वरूप सादर करणार असून, यामध्ये 18 जिल्हा संघ 10-मीटर रायफल आणि पिस्तूल स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. एकूण 144 खेळाडू आपापल्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यामध्ये रायफल आणि पिस्तूल अशा दोन्ही प्रकारांच्या स्पर्धांचा समावेश आहे. स्पर्धेत समलिंगी संघांची तरतूद असून, कोणत्याही लिंग-आधारित निर्बंधांशिवाय समावेशकतेवर भर देण्यात आला आहे.
राही सरनोबत, अंजली भागवत, सुमा शिरूर, दिपाली देशपांडे, तेजसविनी सावंत, रुद्रांक्ष पाटील, आणि रोनक पंडित यांसारखे दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले आहेत.लीगमधील खेळाडूंच्या विकासासाठी आपले कौशल्य आणि अनुभव देण्याचे आश्वासन यावेळी या खेळाडूंनी दिले.ही लीग महाराष्ट्रातील उदयोन्मुख नेमबाजांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळवून देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
असे आहेत संघ
शोभो जायंट्स (मुंबई शहर) -सांगली अल्फा लायन्स (सांगली)
वेस्टर्न रेंजर्स (मुंबई उपनगर) - नाशिक नेम-बाज (नाशिक)
रत्नागिरी शिलेदार (रत्नागिरी) -गोल्डन फिंगर (पालघर)
अमरावती धुरंधर (अमरावती) -सोलापुरी ब्रह्मास्त्र (सोलापूर)
रोकठोक ठाणे (ठाणे) - अहिल्यानगर लक्षवीर (अहिल्यानगर)
आम्ही पुणेकर (पुणे) -औरंगाबाद संघ
राजधानी सातारा (सातारा) - वर्धा वॉरियर्स (वर्धा)
कोल्हापूर बायसन्स (कोल्हापूर) - चंद्रपूर डायमंड्स (चंद्रपूर)
रायगड वॉरियर्स (रायगड) -नागपूर टायगर्स (नागपूर)







