तिसरी मुंबईसाठी सुरू होता ड्रोन सर्व्हे
| चिरनेर | प्रतिनिधी |
तिसरी मुंबईच्या ड्रोन सर्वेक्षणासाठी रस्तोरस्ती रंगाच्या आधारे प्लॅटफॉर्म उभारणाऱ्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी हुसकावून लावले असल्याची सनसनाटी घटना समोर आली आहे. सारडे गावातील रस्त्यांवर अशा प्रकारचे काळे पिवळे पट्टे मारण्यासाठी आलेल्या संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले असून, पुन्हा या भागात याल तर परिणाम वाईट होतील, असा सज्जड दमदेखील दिला आहे.
उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 महसुली गावांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने के.एस.सी. नवनगर नावाने तिसरी मुंबई उभारण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पाच्या निमित्ताने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने फसवी साडेबावीस टक्क्यांची योजना जाहीर केली आहे. मात्र, आधीच्या सिडको आणि नवी मुंबईच्या विकसित भूखंड देण्याच्या अत्यंत वाईट अनुभवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी सरकारने दाखविलेले हे गाजर यापूर्वीच धुडकावून लावलेले आहे. मुंबईपासून अगदी 35 मिनिटांवर असलेल्या उरणच्या कोणत्याही शेतकऱ्याला सरकारची साडेबावीस टक्क्यांची योजना अजिबात मान्य नाही. त्याचबरोबर आधीचा अनुभव पाहता साडेबावीस टक्के सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना केवळ पावणेसोळा टक्के भूखंड मिळत आहेत. हे भूखंड मिळविण्यासाठीदेखील शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांचे विविध प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत. हा आकडा एका गुंठ्यामागे लाखो रुपयांच्या घरात जात असल्याने शेतकऱ्यांना ही साडेबावीस टक्क्यांची योजनाच मान्य नाही. तशा प्रकारची निवेदनेदेखील येथील केएससी नवनगर विरोधी शेतकरी संघर्ष समितीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींना दिली आहेत.
असे असतानाच आत्ता सरकारच्यावतीने ड्रोनद्वारे जमिनीचा सर्व्हे करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने केएससी टाऊनसाठी जीआयएस आधारित विद्यमान भू-वापर आराखडा तयार करण्याकरिता मेसर्स टेककॉम अर्बन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ड्रोन सर्व्हेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे काळे-पिवळे आकाराचे पट्टे गावोगावी मारायला सुरूवात केली आहे. आधीच शेतकऱ्यांच्या विरोधाची सरकारकडून फारशी दखलही घेतली नाही. असे असतानाच गावोगावच्या रस्त्यांवर स्थानिक कोणत्याच प्राधिकरणाची साधी परवानगी न घेता या पट्टे मारण्याच्या कृतीला गावकरी जोरदार विरोध करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून असे ड्रोन सर्व्हेच्या निमित्ताने गावकुसाबाहेर रस्त्यांवर काळे-पिवळे पट्टे मारायला येणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता संतप्त शेतकऱ्यांकडून हुसकावून लावण्याचा काम केले जात आहे.
सारडे येथील शेतकऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावताना पुन्हा या भागात दिसलात तर परिणाम वाईट होतील, असा सज्जड दमही दिला आहे. गोवठणे गावातदेखील अशाच प्रकाराचे पट्टे मारण्यात आले होते. येथील गावकऱ्यांनी सरकारच्या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. तिसरी मुंबईविरोधात येथील 25 हजार शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदवल्या आहेत, त्या हरकतींवर साधी सुनावणीदेखील न घेता सरकारने हा प्रकल्प या ठिकाणी लादण्याचा अट्टाहास चालविला आहे. त्या या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आता गावोगावी ड्रोन सर्व्हेसाठी पट्टे मारायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले आहे. चिरनेर गावातही गावकऱ्यांनी या सर्व्हे कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले आहे.






