| कोर्लई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे),जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या विद्यमाने तांग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि तांग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन नांदुरा, जिल्हा बुलढाणा यांच्या सहकार्याने दि.24 व 25 मार्च 2026 रोजी राज्यस्तरीय शालेय तांग सू डो स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यात राज्यातील आठ विभागातील 250 पेक्षा जास्त खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेत मुंबई विभागाने चमकदार कामगिरी करत सर्वाधिक 17 सुवर्ण पदक, 5 रौप्यपदक व 1 कांस्यपदक पटकावत प्रथम ठरला तर खुशी सर्वेश शेट्ये हिने दमदार कामगिरी करून रौप्यपदक पटकावले.
रिलायन्स फाउंडेशन स्कूल, लोधीवलीची विद्यार्थिनी खुशी सर्वेश शेट्ये हिने क्रमशः शालेय जिल्हास्तर व मुंबई विभागीय निवड चाचणीत प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेकरीता आपलं स्थान निश्चित केले तसेच नांदुरा येथे ही राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून रौप्यपदक पटकावले. खुशी हिला मास्टर विजय तांबडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक अभिषेक तांबडकर व स्वप्ना तांबडकर यांनी प्रशिक्षण दिले. तसेच मुख्याध्यापक धीरेंद्र हरबोला व क्रीडा प्रशिक्षक अजय पाटील यांनी विशेष प्रोत्साहन दिले. खुशीने मिळविलेल्या यशाबद्दल जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी तसेच रिलायन्स फाउंडेशन शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जिल्ह्यातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.







