| आगरदांडा | प्रतिनिधी |
लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण ही केवळ काँग्रेस किंवा राहुल गांधी यांची जबाबदारी नसून प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही लोकशाहीच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा. तसेच, मत कोणाला द्यायचे? हा प्रत्येक मतदाराचा वैयक्तिक अधिकार असला, तरी प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहणे आवश्यक आहे. तसेच, यावर्षी कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे मुरुड तालुक्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे मुरुड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि नुकसानग्रस्तांना तातडीने योग्य नुकसानभरपाई आणि शासकीय आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी केली. राष्ट्रीय काँग्रेसच्या रायगड जिल्हा व मुरुड तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सोमवारी (दि.16) मुरुड शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या मोर्चातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. शहरातील आझाद चौक येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, कार्याध्यक्ष सुदेश वाणी, मुरुड तालुकाध्यक्ष प्रितम पाटील यांच्यासह कृष्णा अंबाजी, चिंतामणी मकु, सुरेंद्र मकु, सुधीर दांडेकर, संतोष बुल्लू, शबाब उलडे, किशोर कार्लेकर, शकील कडू, नगरसेविका सुगंधा मकु, सुमन पाटील, तालुका महिलाध्यक्ष मंजु घोले, इस्माईल घोले, इस्माईल शेख, उमेश भोईर, गणेश गाणार, नरेश बुल्लु, अब्दुल सलाम झोंबडकर, जयश्री बळी, रुपाली मकु, पूजा जठारी, सुमन रावजी यांच्यासह काँग्रेसचे महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चानंतर मुरूड तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांसाठी नायब तहसीलदार संजय तवर यांच्योकडे विविध मागण्यांसंदर्भात दोन स्वतंत्र निवेदने देण्यात आली.
या मोर्चादरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार प्राप्त झाले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य आणि मतदानाचा अधिकार हे लोकशाहीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. मात्र, सध्या मतदान प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होत असून, एसआयआर प्रक्रियेच्या नावाखाली अनेक पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेची योग्य आणि पारदर्शक पडताळणी झाली पाहिजे. कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये, अशी ठाम भूमिका जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी मांडली.
ते पुढे म्हणाले की, या मुद्द्यावर देशभरातील विरोधी पक्षांच्या आंदोलनाचे नेतृत्व राहुल गांधी करीत आहेत. दि.1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झालो होतो. लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण ही केवळ काँग्रेस किंवा राहुल गांधी यांची जबाबदारी नसून प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही लोकशाहीच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा. मत कोणाला द्यायचे हा प्रत्येक मतदाराचा वैयक्तिक अधिकार असला, तरी प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहणे आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्था आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्षासोबतच सामान्य नागरिकांनीही या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राजाभाऊ ठाकूर यांनी केली.
तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे मुरुड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पाण्याची टंचाई, शेतीचे नुकसान आणि घटलेले उत्पन्न यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे मुरुड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा. त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना तातडीने योग्य नुकसानभरपाई आणि शासकीय आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देखील राजाभाऊ ठाकूर यांनी केली.







