एमपीसीबीच्या संकेतस्थळावर कारखाना मालकांना इशारा
। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार असल्याचे सांगत काही भामटे कारखानदारांची फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या संकेतस्थळावर अशा भामट्यांविरोधात तक्रार करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रदूषण मंडळाकडून अशा कोणत्याही अधिकार्याची नेमणूक करण्यात आली नसल्याची माहिती अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
अलिकडे रासायनिक कारखान्यांमधून होणार्या प्रदूषणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. तळोजा औद्योगिक परिसरातुन देखील होत असलेल्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, प्रदूषणाविरोधात जनता संतप्त आहे. अशा परस्थितीचा फायदा घेण्यासाठी काही ठग सरसावले आहेत.
प्रदूषण मंडळाच्या सल्लागार पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आपल्या कारखान्यातून होणार्या प्रदूषणाची तपासणी करण्याची आणि प्रदूषणावर लक्ष ठेवण्याची जवाबदारी आमच्यावर असल्याची माहिती भामटे कारखानदारांना देत त्यांची फसवणूक ठग करीत आहेत. अशात भामट्यांपासून कारखानदारांनी सावध राहावे यासाठी केंद्रीय प्रदूषण महामंडळाकडून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने देखील आपल्या संकेतस्थळावर नोटीसद्वारे आवाहन करण्यात आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहती असलेल्या रसायनिक कारखान्यानमधून प्रदूषण होत असल्याची तक्रार करत अनेक स्वयंभु पत्रकार आणि समाजसेवक कारखानदारांना वेठीस धरत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अशा वेळेस कारखानदारांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर अथवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एमपीसीबीकडून करण्यात आले आहे.