| उरण | प्रतिनिधी |
राज्यातील मत्स्योद्योग आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे खिळखिळा झाला असताना, त्यावर मत्स्य विभागातील कथित भ्रष्टाचाराने आणखी मीठ चोळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस येत आहे. मच्छिमार आर्थिक संकटात होरपळत असताना, अधिकारी मात्र मलिदा खात असल्याचे गंभीर आरोप उरण परिसरातून समोर येत आहेत. तरी अशा मत्स्यव्यवसायाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना बढती न देण्याची संतप्त मच्छिमारांची मागणी जोर धरू लागली आहे.
डिझेलच्या वाढत्या दरामुळे अनेक मच्छिमारांना बोटी बंदरात उभ्या ठेवण्याची वेळ आली आहे. अशा बिकट काळात प्रशासनाने धावून येणे अपेक्षित असताना, काही अधिकारी रजेवर, तर काही एसी ऑफिसमध्ये बसून कारभार करत असल्याचा आरोप मच्छिमारांकडून होत आहे. विशेषतः सहाय्यक आयुक्त संजय पाटील आणि उरणचे परवाना अधिकारी सुरेश बाबुलगावे यांच्या भूमिकेवर संशयाची सुई रोखली गेली आहे. याहून धक्कादायक म्हणजे, या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची चर्चा सुरू असल्याने मच्छिमारांमध्ये संताप उसळला आहे. घोटाळे करणाऱ्यांना बढती, आणि प्रामाणिक मच्छिमारांना संकट? असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची पदोन्नती तात्काळ रोखावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना बढती न देण्याची मच्छीमार बांधवांची मागणी जोर धरू लागली आहे.







