माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांचा पाठपुरावा
। नेरळ । प्रतिनिधी ।
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी जाणयासाठी असलेल्या एकमेव घाटरस्त्याचे दुरुस्तीचे काम एमएसआयडीसीकडून करण्यात येत आहे. घाटरस्त्यातील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात दगड येऊन पडले आहेत. हे दगड काढण्यात यावेत यासाठी माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी पाठपुरावा केला होता. दरम्यान घाटरस्त्यातील गटारे आणि रस्त्यात आलेले मोठे दगड बाजूला करण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने पावसाळ्यात पडणारे पाणी गटारांमधून सरळ जाण्याची शक्यता आहे.
माथेरान या पर्यटनस्थळी येणारे पर्यटक यांचा नेरळ- माथेरान घाटरस्त्यातून होणारा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी नेरळ- माथेरान घाटरस्ता सुरक्षित करण्याचे काम एमएमआरडीए कडून करण्यात आले आहे. त्यांनतर रस्त्यावरील सिमेंट गटारे ही पाणी वाहून नेण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला बांधण्यात आली होती. माथेरानचे डोंगरात दरवर्षी 5000 मिलीमीटर पावसाची नोंद होते आणि त्यामुळे डोंगरातून पाण्याबरोबर माती आणि दगड देखील वाहून येत असतात. ते दगड रस्त्यातून अनेकदा रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात पडतात. त्यांनतर पावसाळा संपल्यानंतर पुढील पावसाळा सुरु होण्याच्या आधी घाटरस्त्यातील गटारांची स्वच्छता करणे आवश्यक बाब असते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयांच्याकडून एकदाही अशी कामे झाली नाहीत. त्यामुळे माथेरान -नेरळ घाटातील गटारे दगडांनी आजपर्यंत भरलेली होती.
ही बाब माथेरानचे माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्याकडून समोर आणण्यात आली. त्यानंतर एमएसआयडीसी कडून घाटरस्त्याची पाहणी करण्यात आली. त्यावेळी पावसाळा सुरु होण्याआधी किमान घाट रस्त्यातील गटारे स्वच्छ करण्याची कामे प्रधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले होते. त्यानुसार पावसाळा सुरु होण्यास एक महिना शिल्लक असताना एमएमआयडीसी कडून घाटरस्त्याचे गटारे साफसाई करण्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात घाटरस्त्यातील गटारे हि पाण्याने भरून वाहणार असल्याने रस्ता सुस्थितीत राहण्यास मदत होणार आहे.







