| कोर्लई | प्रतिनिधी |
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशनने राज्यातील अक्युपंक्चर उपचारकांसाठी भव्य महा अक्युपंक्चर रत्न पुरस्कार-2026 सन्मान सोहळा आयोजित केला आहे. यात रायगड जिल्ह्यातील चौघांची निवड झाली आहे. यात मुरुड तालुक्यातील विजय चंद्रकांत तांबडकर व सिध्देश गजानन बैकर, खोपोलीतील अर्चना विनोद सावंत व पनवेल येथील वंदना पृथ्वीराज यशवंते यांचा समावेश आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे रविवार दि. 19 जुलै रोजी महा अक्युपंक्चर रत्न पुरस्कार-2026 सोहळा पार पडणार असून यात राज्यातील अक्युपंक्चर उपचारकांचा गौरव करण्यात येणार आहे.
आधुनिक जीवन शैली जगत असताना अनेक तात्कालिक व जीर्ण रोगांचे प्रमाण वाढले असून त्यावर आधुनिक औषधांचा दुष्परिणाम पाहाता लोकांचा कल पारंपारिक, पुरक व पर्यायी चिकित्सा पद्धतीकडे वाढला असून राज्यातील अनेक अक्युपंक्चर तज्ञ आपल्या उपचाराने रुग्णांना दिलासा देत आहेत. जे उपचारक कायदेशीर रजिस्ट्रेशन घेऊन ॲक्युपंक्चरचा प्रसार प्रचार करत आहेत, अशा उपचाराकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात येणार आहे.
मिशन विजय अंतर्गत आरोग्य व क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अक्युपंक्चर, योग निसर्गोपचार उपचारक मास्टर विजय चं. तांबडकर व त्यांचे सहकारी अक्युपंक्चरीस्ट सिध्देश गजानन बैकर, वंदना पृथ्वीराज यशवंते, अर्चना विनोद सावंत यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.







