प्रशासनाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गांवरील चौपदरी करणाच्या कामाची परिस्थिती पाहता एक ना धड, भराभर चिंध्या अशीच झाली आहे. कारण या मार्गांवरील चौपदरी करणाच्या कामाला 18 वर्षे पूर्ण झाली तरी हे काम अद्याप ही पूर्ण झाले नाही. या मार्गावरील सर्वच कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्याचबरोबर महामार्गावर ज्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत त्याच ठिकाणी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन देखील फोल ठरले आहे. त्यामुळे महामार्गाचे काम पुर्ण करण्यात सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मुंबई-गोवा महामार्गवरील रस्त्याची अक्षरशः चालण झाली आहे. या शिवाय या मार्गावरील सर्वच दिशादर्शक फलकाजवळच खड्ड्यांचे साम्राज पसरले आहे. त्यामुळे एका बाजु कडून दुसऱ्या बाजूकडे जाणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गांवरील माणगाव, इंदापूर, तळवली, कोलाड, गोवे स्टॉप, पुई स्टॉप, खांब, सुकेळी, नागोठणे यासर्वच दिशादर्शक फलकाजवळ रस्त्याची भयानक अवस्था झाली आहे. त्यामुळे एखाद्या प्रवाशाचा नाहक बळी गेला, तर याला जबाबदार कोण? अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुन अखेर या महामार्गाचे काम पूर्ण होईल, आश्वासन दिले होते. परंतु, पुन्हा एकदा त्यांचे आश्वासन फोल ठरले आहे. निदान महामार्गावर पडलेले खड्डे तरी बुंजवण्याचे कष्ट सरकार घेणार का? साधारण लोकप्रतिनिधींच्या वागण्यावरून असेच वाटते की, त्यांना प्रवाशांच्या जीवाशी काही देणंघेणं नसून ‘रस्ता गेला खड्ड्डयात’ अशी त्यांची मनस्थिती असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हा महामार्ग चौपदरीकरण व्हावा, यासाठी पत्रकार संघटना व विविध सामाजिक संघटना यांनी आंदोलन करून रस्तारोको केला होता. त्यानंतर या महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली आणि कामाला देखील सुरुवात झाली. परंतु, उद्यापही या महामार्गाचे काम पुर्णत्वास गेलेले नाही. दरम्यान, लोकनेत्यांकडून गेली 18 वर्षे अनेक डेडलाईन देण्यात आल्या. हा महामार्गाचे काम करण्यासाठी अनेक ठेकेदार आले आणि किती गेले. परंतु, महामार्गाचे काम काही केल्या पूर्ण होईना. केंद्रीय मंत्र्यांचेच आश्वासन फोल ठरत असतील तर स्थानिक नेत्यांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? या ठिकाणी अनेक गंभीर अपघात झाले आहेत. अनेकांचा नाहक बळी गेला आहे. काहींना आयुष्यभराचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे सरकारला अजुन किती बळी गेल्यावर जाग येणार, अशी संतप्त प्रतिक्रीया प्रवासी वर्गातून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी लोकनेत्यांकडून अनेक डेडलाईन देण्यात आल्या. तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम जुनपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले होते. परंतु, जुन महिना संपत आला तरी हे काम पूर्णत्वास गेलेल नाही. त्यातच भर म्हणजे प्रचंड पडलेल्या पावसामुळे या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आता चाकरमान्यांचा अंत पाहु नका. या ठिकाणी टोल नाका सुरु करण्याआधी रस्त्याचे काम पूर्ण करा. अन्यथा तुमचे डोळे उघडण्यासाठी चाकरमान्यांना रस्त्यावर उतरावे लागेल.
चंद्रकांत लोखंडे,
सामाजिक कार्यकर्ते